Logo Omkar Mission Dombivali

महायोग विज्ञान

महायोग हे विज्ञान आहे. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्यावर विज्ञानामध्ये असलेली प्रत्यक्ष कृती (Practical) व शाब्दिक ज्ञान (Theoretical) हे भाग महायोगा मध्ये सुद्धा अंतर्भूत करावे लागतात. महायोग विज्ञाना मधील ‘तत्वमसी’ हे महावाक्य म्हणजे ‘ते ब्रम्ह तूच आहेस’ हे शाब्दिक ज्ञान आहे. मी ब्रम्ह आहे. मी ब्रम्ह आहे, सोऽहं, सोऽहं असा कुणी कितीही उदघोष केला तरी जोपर्यंत त्या ब्रम्हाची प्रत्यक्ष अनुभूती देणारा समर्थ सदगुरू भेटत नाही तोपर्यंत त्या शाब्दिक ज्ञानाला काहीही महत्व नाही. उदाहरणार्थ रसायनशास्त्राचा एक प्रयोग आहे H2+O=H2O. प्रयोगशाळेत योग्य अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग न करता आपण H2O चा कितीही जप केला तरी H2O काही तयार होणार नाही.

महायोग विज्ञानाच सुद्धा असच आहे. तुम्ही कितीही ‘मी ब्रम्ह आहे’, ‘मी ब्रम्ह आहे’ असा जप करा पण जोपर्यंत तुम्ही योग्य सदगुरूच्या सानिध्यात महायोग विज्ञानाचे प्रयोग करत नाही तोपर्यंत तुम्हांला ‘अहं ब्रम्हास्मि’ ची अनुभूती कधीही येणार नाही. सदगुरू हे शक्तीसंपन्न असतात. महायोग विज्ञान त्यांनी पूर्ण आत्मसात केलेले असल्यामुळे ते काही मिनिटातच सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देऊ शकतात. त्यासाठी देश, काळ, वय, जात, धर्म, पंथ व संप्रदाय या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. महायोग हे विज्ञान असल्यामुळे त्याची अनुभूती घेण्यासाठी कुणालाही, कसल्याही प्रकारचे बंधन नाही. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी आहे त्याचप्रमाणे ईश्वरीय ज्ञान व ईश्वरीय अनुभूती सर्वांसाठी आहे व ती सर्वांना येऊ शकते. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्या नंतर शास्त्र हे बोलण्यासाठी अथवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी नसून ते प्रायोगिक असतात हे दुसरे सत्य सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल.

आपल्याला ज्ञात असलेल्या प्रकाश लहरी मधला केवळ एक छोटासा भाग रंगरूपाने आपल्याला दिसत असतो. यथार्थ ज्ञान हे मनबुद्धीच्या अतीत आहे. मन बुद्धीच्या पलीकडे जाण्यासाठी जे साधन आहे ते अतींद्रिय स्वरूपाचे आहे. ह्या अतींद्रिय स्वरूपाचे विश्लेषण करणारे जे विज्ञान आहे त्या विज्ञानालाच महायोग विज्ञान म्हणतात.

महायोग हे विज्ञान आहे, महायोग विज्ञान सिद्ध करण्याची सुद्धा एक प्रायोगिक पद्धत आहे. अर्थात इतर सर्व विज्ञान शास्त्राप्रमाणे त्याची प्रायोगिक पद्धती थोडी वेगळी आहे. पदार्थ विज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र, मानसशास्त्र, खगोलशास्त्र या सर्व विज्ञान शास्त्रांच्या प्रायोगिक पद्धती एकसारख्या नाहीत. पदार्थ विज्ञान शास्त्राची प्रयोगपद्धती मनोविज्ञानाच्या प्रयोग पद्धतीहून वेगळी आहे आणि असायलाच पाहिजे. कारण ज्या विज्ञानाचे जे क्षेत्र आहे त्या विज्ञानाने त्या आपल्या विशिष्ठ क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रानुसारच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने प्रयोग करून आपले सिद्धांत मांडावयास हवेत.

पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र विज्ञानाचे भौतिक जगत हे क्षेत्र आहे आणि तद्नुरूप त्यांच्या प्रायोगिक पद्धतीही भौतिक आणि इंद्रियजन्य आहेत. महायोग विज्ञानाचे क्षेत्र मनोजगत आहे आणि तद्नुरूप त्याच्या प्रायोगिक पद्धती सुद्धा मानसिक आणि इंद्रियातीत आहेत. विज्ञानाप्रमाणे महायोग विज्ञाना मध्येही आपल्याला कित्येक अध्यात्मिक क्रिया वा घटना प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीने कराव्या लागतील व त्यांचे अनुभव घ्यावे लागतील. महायोग विज्ञानाचा अर्थात भक्ती विज्ञानाचा अनुभव न घेता विश्वास ठेवला तर आपली अवनती झाल्याशिवाय राहणार नाही.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *